Cricket World Cup 2023 : नवी दिल्ली : मुंबईतल्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला होता. तो न्यूझीलंडला मोडता आला नाही. भारतीय संघाने न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट्स पटकावल्या. दरम्यान, वानखेडेतील सामन्यावरून खुद्द नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शमीचं कौतुक केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत म्हणाले की, “अनेकांच्या वैयक्तिक कामगिरीमुळे सेमी फायनल हा आणखी खास ठरला आहे. या खेळातील आणि संपूर्ण वर्ल्ड कपमधील शमीची गोलंदाजी क्रिकेटप्रेमी कायमस्वरुपी स्मरणात ठेवतील . शमी चांगला खेळला!”, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी X वर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी X वर पोस्ट करून विराट कोहली आणि मोहम्मद शमीचं अभिनंदन केलं आहे. टीम इंडियाचे अभिनंदन. हे यश अपेक्षित होतं. विराट कोहलीचे त्याच्या विक्रमासाठी आणि मोहम्मद शमीचे त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल विशेष अभिनंदन. वर्ल्ड कप फायनलसाठी ऑल द बेस्ट!, असं शरद पवार म्हणाले.
त्याशिवाय, रनमशीन विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक, श्रेयस अय्यरचं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला. शुबनम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीने न्यूझीलंडची अवस्था ३९/२ अशी झाली. केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ चेंडूत १८१ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. मोहम्मद शमीने केनला बाद करत ही जोडी फोडली. केनने ६९ धावांची चांगली खेळी केली. शमीने त्याच षटकात टॉम लॅथमला बाद करत न्यूझीलंडला आणखी धक्का दिला.