नवी दिल्ली: कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर त्याने ही माहिती दिली. बजरंगने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना बजरंगने लिहिले की, “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हे माझे एकमेव पत्र आहे. हे माझे स्टेटमेंट आहे.”
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी ढसाढसा रडली. आज बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले.
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। ???????? pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) December 22, 2023
बजरंग पुनियाने लिहिले की, आशा करतो की तुम्ही बरे असाल. तुम्ही देशाची सेवा करण्यात व्यग्र आहात. तरीही तुमचं लक्ष आमच्या कुस्तीकडे वळवण्याचा माझा प्रयत्न आहे. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत उपोषणाला बसलो होतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. महिला कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनात मी पण सहभागी झालो होतो. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, परंतु तीन महिने काहीच न झाल्याने आम्ही पुन्हा आंदोलनाला बसलो.
‘आमचे हे आंदोलन तब्बल ४० दिवस चालले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करत त्रास दिला. आम्हाला फक्त आश्वासने मिळाली. २१ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत बृजभूषणने पुन्हा महासंघावर कब्जा केला. महिला कुस्तीपटूंना असे अपमानित केले जात असताना हा पुरस्कार घेऊन मी जगू शकत नाही. त्यामुळे ही हा पुरस्कार परत करतोय ,” असेही बजरंग पुनियाने लिहिले.