नवी दिल्ली : चौथ्या आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये सोमवारी निषाद कुमारने उंच उडी टी-४७ फायनलमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये आतापर्यंत भारताच्या खेळाडूंनी एकूण ९ पदकांवर आपले नाव कोरले आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे चौथ्या आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण ९ पदके जिंकली आहेत. सोमवारी भारताच्या निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी-४७ प्रकारात २.०२ मीटर अंतर पार करून आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. त्याचबरोबर ऐतिहासिक विजयाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले.
आशियाई पॅरा गेम्स २०२३ मधील भारताची कामगिरी :
भारतीय संघात निषाद कुमार व्यतिरिक्त प्राची यादवने महिला कॅनोइंगमध्ये देशाला पहिले रौप्य पदक मिळवून दिले. याशिवाय शैलेश कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. तसेच मरियप्पन थंगावेलूने रौप्य आणि रामसिंग पडियारने भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारताच्या मोनू घनघासने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुटमध्ये १२.३३ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक मिळवून देशाचा गौरव वाढवला. पुरुषांच्या थ्रो बॉलमध्ये प्रणव सुरमा, धरमबीर आणि अमित सिरोहा यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन :
आशियाई पॅरा गेम्समधील भारतीय दलाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, ते भारतीय क्रीडा भावनेचे खरे सार प्रतिबिंबित करतील.
भारतातील ३०३ खेळाडू १७ खेळांमध्ये झाले आहेत सहभागी :
चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने ३०३ खेळाडूंची तुकडी पाठवली आहे. जे आशियाई पॅरा गेम्समध्ये १७ खेळांमध्ये भाग घेत आहेत. २०२० च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लखेराने रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या वर्षीही त्यांच्याकडून खूप अपेक्षा केल्या जात आहेत.