पाकिस्तान संघाला अखेर कसोटी सामन्यात विजय चाखता आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान कसोटीमध्ये वारंवार पराभूत होत असल्याने टीकेची झोड उठवली जात होती. इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर संघात बरीच उलथापालथ झाली. दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघ जिंकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. पण पाकिस्तानने नवख्या खेळाडूंसह दिग्गज इंग्लंड संघाला पराभवाचं पाणी पाजलं आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 10 गडी गमवून 366 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 10 गडी गमवून 291 धावा केल्या. यामुळे पाकिस्तानकडे पहिल्या डावात 75 धावांची आघाडी होती. यासह पुढे खेळताना पाकिस्तानने 10 गडी गमवून 221 धावा केल्या आणि 75 धावांची आघाडी मिळून विजयासाठी 296 धावांचा आव्हान उभं केलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सर्वबाद 144 धावाच करू शकला. पाकिस्तानने या सामन्यात 152 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेमध्ये मोठी उलट फेर बघायला मिळाली.
पाकिस्तान इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ गुणतालिकेमध्ये नवव्या स्थानावर होता. पाकिस्तानची विजयी टक्केवारी 16.670 इतकी होती. आता विजयानंतर ही टक्केवारी 25.92 इतकी झाली असून त्यामुळे गुणतालिकेत त्यांना एका स्थानाचा फायदा झाला आहे. वेस्ट इंडिजला मागे टाकत पाकिस्तानने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 18.52 विजयी टक्केवारीसह नवव्या स्थानावर मागे घसरला आहे. इंग्लंड संघालाही या पराभवाचा फटका बसला असून इंग्लंडची विजयी टक्केवारी 45.59 टक्के होती ती आता घसरून 43.05 टक्क्यांवर आली आहे. असं असलं तरी इंग्लंडचं चौथं स्थान मात्र अबाधित आहे.
दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम असून भारताची विजयी टक्केवारी ही 74.24 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62.50 इतकी असून दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील निकालानंतर गुणतालिकेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊ शकते. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नंबर एक स्थानाला काही फटका बसणार नाही. पण विजयी टक्केवारीमध्ये मात्र घसरण होईल.