IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली असून 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या सिरीजमधील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या सिरीजपूर्वी टीममधील एका खेळाडूला दुखापत झाली आहे. गुरुवारी भारताच्या प्रॅक्टिस सेशनवेळी फलंदाजी करताना भारताचा मिडल ऑर्डर फलंदाज सर्फराज खानला दुखापत झाली आहे. सरफराजच्या कोपराला ही दुखापत झाल्याचं आता समोर आलं आहे. परंतु यावेळी त्याला एमआरआयची आवश्यकता नव्हती. ‘फॉक्स क्रिकेट’ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा सरफराज नेटमधून बाहेर पडत असून त्याने त्याचा उजवा हात धरला असल्याचे दिसत आहे.
दुखापत किती गंभीर?
मिळालेल्या माहितीनुसार, दुखापत गंभीर नसून फलंदाजाला एमआरआय करण्याची गरज नसल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता असल्याने पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये सरफराज खेळू शकतो. जर रोहित सिरीजमधील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर लोकेश राहुलला यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगची संधी मिळू शकते. यावेळी मिडल ऑर्डरमध्ये सरफराज खान खेळताना दिसू शकतो.
सरफराजसाठी ‘हे’ असणार आव्हान..
सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावेळी उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या सिरीजमध्येही त्याने पहिलं टेस्ट शतक झळकावलं. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज सरफराजसाठी मोठं आव्हान ठरू शकते.