मुंबई: 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह अन्य 4 खेळांचा समावेश करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.
2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसोबतच बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोसचेही आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या शुक्रवारीच या पाच खेळांच्या ऑलिम्पिकमधील प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. खरं तर, गेल्या आठवड्यातच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिक 2028 मध्ये या पाच खेळांचा समावेश करण्याच्या लॉस एंजेलिस क्रीडा संघटकांच्या प्रस्तावावर चर्चेला मान्यता दिली होती.
या विषयावरील चर्चेची शेवटची फेरी रविवारपासून मुंबईत झाली आणि त्यानंतर आज (सोमवार) दुपारी या खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश
1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट खेळले गेले होते. म्हणजेच 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी बरेच दिवस प्रयत्न सुरू होते. आता क्रिकेटला जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. यासाठी आयसीसीने खूप मेहनत घेतली आहे. ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धा असतील. सध्या 6-6 संघांनाच प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसांत संघांच्या संख्येबाबत स्पष्टता येऊ शकते.