पुणे : तरुणीकडील पिशवीमध्ये स्वतःचा मोबाइल क्रमांक लिहिलेला कागद टाकून, ‘मला फोन केला नाही, तर तुझ्यावर अॅसिड टाकेन,’ अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार पुणे स्टेशन येथील पीएमपी बस स्थानकात घडला. या प्रकरणी संबंधित तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून एका अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीबाबत २६ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव शेरी येथून पुणे शहरात मामाकडे आली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई देखील होती. पुन्हा वडगाव शेरी येथील घरी जात असताना पुणे स्टेशन परिसरातील पीएमपी स्थानकात त्या दोघी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी असलेल्या नराधम तरुणाने तरुणीला तिचा मोबाइल क्रमांक देण्यास सांगितले. मात्र, तरुणी त्याला ओळखत नसल्याने तिने स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्यास ठामपणे नकार दिला.
दरम्यान, स्थानकात वडगाव शेरीला जाणारी बस आली. संबंधित तरुणी आईसह बसमध्ये चढत असताना आरोपीने पाठीमागून तिचा हात जोरात खेचला आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल से वर्तन केले. ‘मला पुन्हा भेट’ असे सांगून तरुणीकडील पिशवीमध्ये स्वतःचा मोबाइल नंबर लिहिलेला कागद टाकला.
संबंधित तरुणाने तिला ‘मला फोन केला नाही, तर तुझ्यावर अॅसिड टाकेन,’ अशी धमकी दिली. तरुणीने दिलेल्यामाहितीनुसार, याच तरुणाने दोन महिन्यांपूर्वीही तरुणीशी जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने स्तप्त झालेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नेंदवली.
बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, तरुणाने चिठ्ठीवर लिहून दिलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.