येरवडा : येरवडा अग्रसेन हायस्कुल येथील पैसे देण्यास नकार दिल्यावरून एका हॉटेलचालकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) घडली होती. यामध्ये विकी राजू चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, येरवडा) जखमी झाला होता. त्यानंतर ससून रूग्णालयात चंडालिया याच्यावर उपचार सुरू होते. २० एप्रिल रोजी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह राहत्या घरी जय जवाननगर आण्यात आला त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रसेन हायस्कूलसमोरील व्ही. आर. ४ यू हॉटेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास संशीयत आरोपी आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अभिषेक चंडालिया, संदेश जाधव, सुशांत कांबळे, संकेत तारू आले. त्यांनी हॉटेलचालक विकी याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी विकीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर आकाशने ‘आज तुझा गेमच करतो’ असे म्हणत पिस्तुलातून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबार करून आरोपी पसार झाले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.