राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मुळा-मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या उद्भभवली आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेद्वारे केला जाणारा अतिरिक्त पाण्याचा वापर, याबाबत आमदार राहुल कुल यांनी पावसाळी आधिवेशनामध्ये कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.
बैठकीमध्ये प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. मुळा मुठा व भीमा नदीच्या दूषित पाण्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीकाठचे नागरिक त्रस्त आहेत. जल प्रदूषणामुळे त्यांना विविध आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (Yavat News) विशेषतः उन्हाळ्यात जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो. नदीतील जलजीवांवर विपरित परिणाम होतो तसेच डासांची पैदास होऊन नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. जलपर्णीला आळा घालण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, आधुनिक तंत्रज्ञान वापरून याबाबत कायस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, याबाबत चर्चा झाली.
खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्यातून अधिक पाणी वापर होत असल्याने, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. (Yavat News) याबाबत अतिरिक्त वापर झालेले पाणी पुनःप्रक्रिया करून सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.
या वेळी उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिले. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : फुलांच्या पायघड्या अन् स्वागत गीताने पाटस येथे ज्येष्ठांचे अनोखे स्वागत