राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : कोरमअभावी यवत येथील विशेष ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की यवत ग्रामपंचायतवर आली. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबवण्याबाबत विशेष ग्रामसभेचे शुक्रवारी (दि.११) सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सकाळी ११.३० सुमारास ग्रामसेवक कदम यांनी कोरमअभावी विशेष ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगितले.
गावातील दर्शनी भागात असलेल्या नोटीस बोर्डवर कोठेही याबाबत फलक लावलेला नाही. तसेच ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे ग्रामसभेपूर्वी ७ दिवस अगोदर दवंडी देण्याची आवश्यकता असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी एक दिवस अगोदर अचानक दवंडी देत उद्या ग्रामसभा असल्याचे सांगितले.
गावातील अनेक नागरिक हे आपले दैनंदिन व्यवहार करत असताना गावात असतीलच असे नाही. त्यामुळे अशी अचानक ग्रामसभा ठेवल्याने नागरिकांना समस्या असून, देखील उपस्थित राहणे शक्य होत नाही. विशेष ग्रामसभा असून देखील या ग्रामसभेसाठी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, गौरव दोरगे व राजेंद्र शेंडगे वगळता इतर सर्व सदस्यांनी व सर्वच शासकीय विभागांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली.
दरम्यान, १५ हजारच्या जवळपास मतदार असलेल्या यवत येथील ग्रामसभेसाठी फक्त २० ते २५ नागरिकच उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून अधिकाधिक नागरिक ग्रामसभेसाठी कसे उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.