राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पाटस येथील गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एम. व्ही. भागवत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठ नागरिकांचे फुलांच्या पायघड्या घालून व गुलाब पुष्प देऊन, स्वागत गीत गात अनोखे स्वागत करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक दिनी पाटस येथील एम. व्ही. भागवत विद्यालयात कार्यक्रम
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दौंड-शिरूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे संपर्क प्रमुख व ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम (मुंबई) प्रादेशिक विभागाचे पुण्याचे सचिव डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड यांनी भूषविले. या सोहळ्यास नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस, श्री भानोबा ज्येष्ठ नागरिक संघ कुसेगाव, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ रोटी यांच्यासह सुमारे ७० ते ८० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. (Yavat News) कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड व गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पूजन केले. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना प्राचार्य रोहिदास खेतमाळीस म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवाची शिदोरी असते. आई-वडिलांप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. डॉ. लाड यांनी, ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्या, शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचे काम, आई-वडील, पालक, पोषण व चरितार्थ कायदा २००७-२०१०, जनसेवा हीच ईश्वर सेवा, आदी विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
शाळेच्या लिपीक ताम्हणे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व कवितेतून व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभास रोटी येथील रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ निवृत्ती शितोळे , (Yavat News) श्री भानोबा ज्येष्ठ नागरिक संघ कुसेगांवचे अध्यक्ष विठ्ठल विनायक शितोळे, सचिव हशीम गुलाबभाई शेख, माणिकराव चोरमले, अरुणराव भागवत यांसह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खामकर यांनी केले तर प्राध्यापक कोळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे आभार मानले.(Yavat News) कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांसह प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : रोटी घाटात चौघांनी दुचाकीस्वारास लुटले