राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा… अशी आस मनात धरुन लोणी काळभोरहून निघालेल्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यवत (ता. दौंड, जि. पुणे) याठिकाणी गुरुवारी (ता. १५) आगमन होत आहे. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावतो. पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर समाज आरतीनंतर वारकऱ्यांना एका आगळ्या-वेगळ्या मेजवानीचा आस्वाद दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडीतपणे वारकऱ्यांना पिठलं-भाकरीचे भोजन दिले जाते. ग्रामीण भागातील चूलीवरील पिठलं-भाकरीचा वारकरी मनमुराद आस्वाद घेतात.
अनेक वर्षांची परंपरा
अनेक वर्षांपासून यवतमधील ग्रामस्थ श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी उत्तम व्यवस्था करत आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील(Yavat News)n शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. देहू येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा मुक्काम शहर परिसरात असल्याने तेथेही वारकऱ्यांना मेजवानी दिली जाते. मात्र, यवत मुक्कामी ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी चूलीवरील पिठलं-भाकरी वारकऱ्यांना घरच्या जेवणाची आठवण करून देते.
यवतच्या पिठलं-भाकरीची चव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पिठलं बनवलं जातं तर भाकरी गावातील प्रत्येक घरातून देण्याची अनोखी प्रथा आजपर्यंत चालत आलेली आहे. (Yavat News) गेल्या अनेक वर्षांपासून यवत गावातील सर्वच नागरिक आपापल्या परीने पाच, दहा, ५१ ते अगदी पोतंभर पिठाच्या भाकरी तयार करून पालखी येण्यापूर्वी मंदिरामध्ये आणून देतात. दरवर्षी पालखी येण्याच्या दिवशी सकाळपासूनच मंदिर परिसरात या बेताची तयारी सुरू असते. यावर्षी जवळपास ९०० किलो डाळीचे पिठले मंदिरात बनवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यवत ग्रामस्थांसोबतच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ देखील वारकऱ्यांच्या प्रेमापोटी भाकऱ्या उपलब्ध करून देतात. हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याने यवत येथील हजरत बडेशाहवाली बाबा दर्गा येथे देखील भाकऱ्या बनवून वारकऱ्यांना वाटप केले जाते. (Yavat News) गावकऱ्यांच्या वतीने मंदिराच्या शेजारी देखील भाकरी बनवण्यात येणार आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील जवळपास ५० दिंड्या हा प्रसाद परंपरेनुसार घेऊन जातात, तर दिंडी व्यतिरिक्त असलेले अनेक वारकरी या प्रसादाचा लाभ घेतात.
पालखी सोहळ्यासाठी आलेले शासकीय पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, वारीत सहभागी झालेले अनेक सामाजिक संस्थेचे सदस्य, पालखी नियोजनासाठी आलेले विविध विभागांचे कर्मचारी, परिसरातून दर्शनासाठी आलेले अनेक भाविक देखील प्रसादाचा आस्वाद घेतात. (Yavat News)लोणी काळभोर ते यवत दरम्यान प्रवास करून आलेले अनेक भाविक देखील या मायेच्या प्रसादाचा आस्वाद घेतात.
पालखीदरम्यान मंदिरात केलेल्या या प्रसादाची चव काय वर्णावी! एकीकडे ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर आणि दुसरीकडे थकल्या-भागल्या वारकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या या गरमा-गरम पिठलं-भाकरीची चव वारकऱ्यांच्या जीभेवर कायमस्वरूपी रेंगाळते…
तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।। म्हणत तृप्त झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी यवतनगरी सज्ज
Yavat News : शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारसह १ लाख रुपयांची चोरी
Yavat News : खामगाव येथे जमिनीच्या वाटणीवरून एकाला मारहाण , तिघांविरुद्ध गुन्हा दाखल