लोणी काळभोर (पुणे): ‘यशवंत’ कारखान्यासह मागील काही वर्षात एक सहकारी बँक, तालुक्याचा खरेदी-विक्री संघ, बाजार समिती अशा विवि्ध सहकारी संस्थाची वाट लावणारी मंडळीच बंद पाडलेल्या कारखान्याची सत्ता मिळण्यासाठी पुन्हा एकदा कारखाना सुरु करण्याचे गाजर सभासदांना दाखवत आहेत. “यशवंत’च्या दिवाळखोरीला कारणीभूत असणारी मंडळीच कारखान्याच्या जमिनीवर डोळा ठेवून सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. कारखाना सुरु करायचा असेल तर “जाऊ तिथे खाऊ’ मनोवृत्ती असणाऱ्या या ‘बिल्डर एजंट, लबाड लांडग्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे, असे मत “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” पॅनलचे प्रमुख प्रकाश जगताप यांनी व्यक्त केले.
पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळवण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे. कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांनी केलेलं काम सर्व सभासदांना माहित आहे. आज त्यांच्याच घरातील तरूण मोरेश्वर काळे हा कारखाना वाचवण्यासाठी घरोघरी फिरत आहे. “यशवंत’च्या दिवाळखोरीला नेमके कोण कारणीभूत आहे, याची कल्पना सर्वच सभासदांना असल्याने “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” पॅनेलच निवडून येईल, असा विश्वासही प्रकाश जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होत असून कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ने वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर भागातील सभासदांच्या गाठीभेटी घेत असताना प्रकाश जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, स्वर्गीय आण्णासाहेब मगर यांनी एका उदात्त हेतूने पूर्व हवेलीच्या माळरानावर तालुक्याच्या विकासासाठी एक अदभूत अन् शाश्वत विकासाचे स्वप्न पाहिले. परंतु, विचारांचा वारसा नसताना फक्त नेतेगिरीची खाज म्हणून पांढरी कपडे घालून मिरवणाऱ्या या लुटारू लोकांनी अगोदर सिटिझन बँकेचे वाटोळे केले. चोराला मोर साक्ष अन् गुरु तसा चेला ही भूमिका घेत माधव काळभोर आणि प्रकाश म्हस्के या जोडगोळीने अध्यक्ष असताना हवेली तालुका खरेदी विक्री संघास स्व. आण्णासाहेब मगर यांनी पुणे बाजार समितीच्या आवारात ३ गुंठ्याचे ४ प्लॉट दिले होते. ते खाजगी बांधकाम व्यावसायिकाला विकण्याचे महापाप करून तालुक्यावर अन्याय केला. तीच मंडळी कारखान्याच्या जमीनीवर डोळा ठेऊन एक इंचही जागा न विकता यशवंत सुरु करू, अशा वल्गना करीत आहेत.
पॅनेल प्रमुख या नात्याने पत्रकारांच्या समवेत बोलतांना बाळासाहेब चौधरी म्हणाले, माजी संचालक पांडुरंग काळे मागील तेरा वर्षांपासून साखर कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना, काही मंडळींनी साधी लोकवर्गणी न देता हास्यास्पद वक्तव्य करत खिल्ली उडवण्याचे काम केले. “यशवंत’च्या दिवाळखोरीला कारणीभूत असणारी मंडळीच कारखान्याच्या जमिनीवर डोळा ठेवत सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ही मंडळी म्हणजे लुटारूची टोळी आहेत. हवेली तालुक्याच्या अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीनही बांधकाम व्यावसायिकांना द्यायची ही यांची भूमिका आहे. करोडोच्या वल्गना करायच्या आणि सभासदांच्या लोकवर्गणीतून सुरू झालेल्या या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरती डोळा ठेवायचा, हीच त्यांची खरी भूमिका आहे.
पॅनेल प्रमुख म्हणून बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, सभासदांना कदाचित माहीत नसेल, परंतु समोरील पॅनल प्रमुख प्रकाश म्हस्के यांनी या अगोदर सिटीजन सहकारी बँकचे अध्यक्ष असताना सभासदांच्या ठेवी बुडवण्याचा भीम पराक्रम केला आहे. चोराला मोर साक्ष अन् गुरु तसा चेला ही भूमिका घेत माधव काळभोर आणि प्रकाश म्हस्के या जोडगोळीने अध्यक्ष असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हवेली तालुका खरेदी विक्री संघासाठी आण्णासाहेब मगर यांनी दिलेली बारा गुंठे शासकीय जागा संस्थेच्या फायद्यासाठी न वापरता स्वतःसाठी वापरण्याचा उद्योग केला आहे. आता हीच टोळी आपल्या तालुक्याची अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोक्याच्या जागेवरती नजर ठेवून आहेत. पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळवण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणं, ही काळाची गरज आहे. याची जाण अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला आहे. तरी सर्व सभासदांनी या पॅनलच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी कपबशी या चिन्हावर शिक्का मारून मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.