विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे): वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने थेऊर तलाठ्यांना आणि सर्कलला कोणतीही भीती राहिल्याचे दिसत नाही. वेळोवेळी त्यांचे अनेक कारनामे ‘पुणे प्राईम न्यूज’ने उजेडात आणले आहेत. त्याचा किंचितही परिणाम त्यांच्यावर आणि जिल्हा महसूल प्रशासनावर झालेला दिसत नाही. तलाठी आणि सर्कलचे अवैध उद्योग नियमित सुरु आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना व नागरिकांना याच्या यातना भोगाव्या लागत आहेत. अशातच थेऊर सर्कल आणि तलाठी यांचा आणखी एक उद्योग समोर आला आहे.
तुकडेबंदी कायद्यानुसार दहा गुंठ्याच्या आतील विक्री व्यवहाराच्या फेरफार नोंदी सातबारावर रद्द झालेल्या असून त्याचा अमंल इतर हक्कांत सातबाराला दिसून येतो. तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असताना रद्द झालेल्या नोंदी मंजूर करण्यासाठी शासनाने २०१७ ला एक सुधारित परिपत्रक काढले असून त्यानुसार चालू शासकीय बाजारभावाप्रमाणे क्षेत्रानुसार पंचवीस टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाला भरल्यास त्या रद्द झालेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तालुका तहसीलदारांना दिलेले आहेत. यामध्ये एकत्रीकरण कायद्याविरुध्द व्यवहार व तुकडेबंदी कायद्याविरुध्द व्यवहार अशा तलाठी व सर्कलने रद्द केलेल्या नोंदी नियमित व मंजूर करण्याची स्पष्ट तरतूद आहे.
मात्र, असे असतानाही तहसीलदारांनी पारित केलेल्या आदेशाची चुकीची अमंलबजावणी तलाठी व सर्कल यांनी केली आहे. खातेदाराच्या नावापुढे खरेदीचे क्षेत्र सातबारावर न लावल्याने थेऊरच्या तलाठी सरला पाटील व सर्कल जयश्री कवडे यांच्या कार्यविवरणाचा नवीनच नमुना समोर आला आहे.
थेऊर येथील गट नंबर ८५९ मध्ये शासकीय परिपत्रकातील तरतुदीनुसार १.७५ आर बाबत चालू शासकीय बाजारभावाच्या पंचवीस टक्के रक्कम नजराणा शासनाला भरुनही सातबारावर खरेदीदाराचे नाव व क्षेत्र येत नसेल तर शासकीय कोषागारात चलन भरुन उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. थेऊर येथील गट नंबर ८५९ बाबत पंचवीस टक्के नजराणा शासन तिजोरीत भरल्याने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५७ अन्वये प्राप्त अधिकारान्वये, मौजे थेऊर, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नं. ८५९ मध्ये फेरफार क्र. १८१८ अन्वये दाखल असलेला एकत्रिकरण कायद्याविरुध्द व्यवहार हा शेरा कमी करणेकामी तलाठी थेऊर यांना आदेशीत केले आहे. तरी देखील खातेदार शेतकऱ्यांच्या नावापुढे खरेदी घेतलेले क्षेत्र सातबारावर दाखल न केल्याने सातबारामधील गुंतागुंत वाढली आहे.
रहिवासी झोनमधील तुकडेजोड व तुकडेबंदीतील व्यवहाराच्या नोंदी नियमित करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकान्वये रेडी रेकनरनुसार पंचवीस टक्के नजराणा भरल्यानंतर हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या तुकडेबंदी एसआर/०४/२०२३ दि. ४/०८/२०२३ आदेशाची पुर्णपणे अमंलबजावणी न झाल्याने शासनाला पंचवीस टक्के रक्कम भरुनही पश्चात्ताप करण्याची व महसूली नियमानुसार खेटे मारण्याची वेळ खातेदारांवर आली आहे. विशेष म्हणजे त्याच गटात शासनाला पंचवीस टक्के नजराणा न भरताही तलाठी व सर्कलच्या कृपेने योग्य अमंलबजावणी करत सातबारावर नोंदी झालेल्या आहेत. म्हणजे पंचवीस टक्के नजराणा शासनाला भरणाऱ्याचा सातबारा चुकवला जातो तर पंचवीस टक्के रक्कम बुडवणाऱ्यांचा सातबारा बिनचूक केला जातो याचे लोकांना विशेष वाटत आहे.
मात्र, थेऊर येथील त्याच गट नबंर ८५९ मध्ये शासनाचा पंचवीस टक्के नजराणा बुडवून दोन गुंठेवारीच्या नोंदी नियमित झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या दोन्ही नोंदीबाबत “एकत्रीकरण कायद्याविरुध्द व्यवहार, सबब नोंद रद्द” असा शेरा लागला नाही. तसेच गुंठेवारीतील त्या दोन्ही नोदींना तुकडेबंदीचा कायदा लागू झाला नसल्याचे सातबारा पाहिल्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “पंचवीस टक्के नजराणा भरणाऱ्यांना महसूली यातना अन् पंचवीस टक्के नजराणा बुडवणाऱ्यांची चंगळ” असं वेगळंच महसूली नियमांचे समीकरण थेऊर महसूल विभागात सुरू आहे.
याबाबत हवेलीचे महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.