पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दारुच्या नशेत वेडीवाकडी कार चालवित असलेल्या तरुणाने महिला पोलिसांना धक्काबुक्की करीत धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नायडु हॉस्पिटल लेन, आरटीओ चौकाच्या अलीकडे शनिवारी १९ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार दिपमाला नायर यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शशांक अवध त्रिपाठी (वय-३६ रा. मार्वेल गंगा, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी नायडु हॉस्पिटलजवळ नाकाबंदी करत होत्या. त्यावेळी कार चालक दारु पिऊन वेडीवाकडी कार चालवत होता. या दारुड्या कार चालकाने मोठ्या लोकांची नावे सांगून तुम्हा सगळ्यांना घरी बसवतो, अशी धमकी पोलिसांना दिली. फिर्यादी यांनी त्याला थांबविले.
त्याची टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना धक्काबुक्की करुन ‘‘तुमको घर पे बैठाऊंगा, कल बताता हू, मै कौन हु,’’ असे जोरजोरात ओरडून शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.