पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी चऱ्होली येथे बांधकाम प्रकल्पात दोन कामगार सज्जावर चढून प्लास्टर करत होते. त्यावेळी अचानक बांधकामाचा सज्जा कोसळला. यामध्ये जखमी होऊन एका कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार जखमी झाला आहे. ही घटना वडमुखवाडी चऱ्होली येथे मंगलमूर्ती हाईट्स या बांधकाम साईटवर २९ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भूषण मनोज राठोड (३२, रा. आळंदी देवाची), अमित दत्तात्रय मोहिते (२६, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार अनिल शिंदे यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथे मंगलमूर्ती हाईट्स या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातील इमारतीच्या टेरेसवरील दरवाजाच्या सज्जाला योग्य सपाेर्ट दिला नाही. या सज्जावर चढून दोन कामगार प्लास्टर करत असताना अचानक सज्जा कोसळला. त्यावेळी सज्जाखाली काम करत असलेल्या ३६ वर्षीय कामगार महिला जखमी होऊन तिचा मृत्यू झाला आहे. कामगार भवरचंद रामादीन डौडे (२५, रा. छत्तीसगड) सज्जावरून पडून गंभीर जखमी झाला आहे.
भूषण राठोड याने सज्जास सिमेंट काँक्रीटचा योग्य सपोर्ट न दिल्यामुळे तसेच बांधकाम कंत्राटदार अमित मोहिते याने बांधकामाची सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, असल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भूषण राठोड आणि अमित मोहिते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.