राहुलकुमार अवचट / यवत : दौंड तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल हे एक व्हिजन असलेला नेता आहे. सर्वांगीण विकासासाठी मी यापुढे राहुल कुल यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या विजयाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे, अशी माहिती भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दिली आहे.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवणे गरजेचे आहे, म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राहुल कुल यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
खडकवासला भुयारी मार्ग, मुळशीचे पाणी यासारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी राहुल कुल यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे असून त्यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातील जनतेला आवाहन देखील केले. दरम्यान, आनंद थोरात हे दौंड तालुक्यातील एक मोठे प्रस्थ असून माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आहेत. केडगाव, बोरीपार्धी परिसरात आनंद थोरात यांच्या सक्रिय सहभागामुळे राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.