पुणे : पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आहेत. त्यांना पुण्यात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हाधिकारी कोण असेल, याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या जितेंद्र डुडी यांची पाठ थोपटली आणि जाहीरपणे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी याल का? अशी विचारणा केली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे गेली अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या पदांवर चमकदार कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुत्रे देण्याकडे पवार यांचा कल असतो. यापूर्वी २०१४ मध्ये नागपूर जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केल्यानंतर पवार यांनी सौरभ राव यांचे पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नाव सुचवले. राव यांनी जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम केले.माळीण गावचे पुनर्वसन, पालखी मार्गांचे विस्तारीकरण आणि मतदारयाद्यांची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावली. तसेच अकोला येथील जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना देखील पवार यांनीच पुण्यात सीईओ म्हणून आणले होते. त्यांनी देखील सीईओ म्हणून चांगले काम केले. आताही जितेंद्र डुडी या सनदी अधिकाऱ्याची प्रशासनात चांगलीच चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतली. या बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डुडी यांनी सादरीकरण केले. इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत हे सादरीकरण प्रभावी ठरले. त्यामुळे पवार यांनी डुडी यांची पाठ थोपटली आणि जाहीरपणे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी याल का? अशी विचारणा केली.
दरम्यान, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आहेत. त्यांना पुण्यात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. या बैठकीला पाच जिल्ह्यांचे वरिष्ठ तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. थेट उपमुख्यमंत्र्यांनीच कौतुक केल्याने प्रशासनात डुडी हे पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून येणार असल्याची चर्चा आहे.