पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१५) पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकीची पुढची दिशा स्पष्ट केली.
‘माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तर गुंजवणे धरणात पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार. एक तर मी शब्द फार जपून देतो, दिला तर पूर्ण करतो’, असं म्हणत अजित पवार यांनी यावेळी भरसभेत पुरंदरकरांना मोठं आश्वासन दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेत अजित पवारांनी जिल्हा आणि तालुक्याच्या विकासकामांवर भाष्य केलं.
ते म्हणाले, ‘व्हिजन असलेला नेता असला की देश पुढे जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक बदल करायचे आहेत. आता सर्वांनी घरे दिली जात आहेत. अनेक कामे सुरु आहेत. केंद्राने ५० टक्के निधी पाण्यासाठी दिला. ५० टक्के राज्य सरकार देत आहेत. तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची बंधने नसतात. टँकर सुरु करण्यात आले आहेत. कांदा बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करत आहोत. 220 कोटी रुपये इतका निधी पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिला’.
बारामतीसारखा पुरंदरचा विकास करून दाखवतो
राज्य सरकारच्या विचारांचा आमदार निवडून गेला की निधी मिळतो. आज माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, बारामती एवढं नाही पण बारामतीसारखा पुरंदरचा विकास करून दाखवतो. पुरंदर उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालली तर सोमेश्वर कारखाना चांगला चालेल, असेही ते म्हणाले.
बारामती काय पवारांचा सातबारा नाही; शिवतारेंचा हल्लाबोल
बारामती पवारांचा सातबारा नाही. पवारांना ५० वर्षे मत दिले, आता नाही, असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ज्येष्ठ नेते शरद पवारांना लक्ष्य केले. तसेच बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत अजित पवारांचा 2019 च्या विधानसभेचा बदला घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शांत राहण्याच्या सूचना देऊनही शिवतारेंनी आज अजितदादांची सासवड येथे होणाऱ्या सभास्थळी आक्रमक बॅनरबाजी केली. त्यामुळे बारामतीवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.