बापू मुळीक
सासवड : पुरंदर पंचायत समितीला पूर्ण वेळ गट विकास अधिकारी नसल्याने, नागरिकांच्या दैनंदिन अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सध्या पुरंदर पंचायत समितीचा तात्पुरता कार्यभार वेल्हा गट विकास अधिकारी पंकज शेळके यांच्याकडे आहे. ते आठवड्यातून फक्त एक किंवा दोन वेळा कार्यालयात येतात, त्यामुळे अनेक शासकीय कामे व नागरिकांची कामे पूर्ण होत नाहीत. यावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कधी निर्णय घेणार? तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार सुद्धा पुरंदर पंचायत समितीसाठी गट विकास अधिकाऱ्यांची मागणी कधी करणार? असा प्रश्न पुरंदरच्या सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुरंदरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ही वाढ पुरंदरचे विद्यमान आमदार सोडवणार का? पुरंदरमध्ये सध्या पाण्याची तीव्रता गंभीर बनत चालली आहे. त्यामध्ये 20 टँकरने 18 गावांना पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. एक वर्षापासून पूर्ण वेळ गट विकास अधिकारीही मिळाले नाहीत. ते कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तर तो कधी मिळणार? नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मुख्यत्वे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा पूर्व पट्ट्या मधील अडीअडचणी या अद्याप पर्यंत तरी सुटलेल्या नाहीत, उलट त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. यावर लवकरात लवकर पुरंदर पंचायत समितीला पूर्ण वेळ देणारा गटविकास अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी पुरंदरच्या नागरिकाकडून मागणी होत आहे.
सध्या मला वेल्हा पंचायत समितीची ऑर्डर असून, त्यात पुरंदरचा सुद्धा चार्ज सांभाळावा लागत आहे. पूर्ण वेळ कोणत्याही पंचायत समितीला दिला, तर नागरिकांच्या अडीअडचणी या सोडवल्या जातील. काहीवेळ इकडे काही वेळ तिकडे दिल्यामुळे मला नागरिकांच्या अडीअडचणी वाढत असलेल्या दिसून येत आहेत. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा.
-पंकज शेळके, गट विकास अधिकारी वेल्हा(पुरंदर)
पुरंदर तालुक्यात नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, पूर्ण वेळे गट विकास अधिकारी यांची नेमणूक महायुती सरकार लवकरात लवकर करेल. पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल, कुणालाही काही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, गट विकास अधिकारी पुरंदरला पूर्ण वेळ देणारा मिळेल.
-विजय शिवतारे, विद्यमान आमदार पुरंदर हवेली