लोणी काळभोर : तुळशीचा विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाचा धूमधडाका सुरू झाला आहे. लग्न समारंभांना मोठ्या प्रमाणात गर्दीही होत आहे. मात्र, सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडून पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरच सर्रास वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरात शेकडो लग्न कार्यालये आहेत. सध्या लग्नसराई सुरु आहे. दिवसभराचे काम उरकून पाहुण्यांना विवाहाला उपस्थित राहता यावे, या उद्देशाने वधू-वर पिता मुहूर्ताची वेळ संध्याकाळची ठेवतात. हवेली तालुक्यातील पुढाऱ्यांना एकाचवेळी अनेक लग्नांची निमंत्रणे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी भेटी देत जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरातील लग्नाच्या वेळी ते उपस्थित राहतात.
रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांच्या भेटी सुरू असतात. लग्न समारंभासाठी नेतेमंडळी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसते. कारण, येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, इच्छुक उमेदवार यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते.
दरम्यान, लग्न समारंभ लवकर उरकून ताबडतोब पुढील कामासाठी आलेले पाहुणे त्यांची गाडी रस्त्यालगत लावतात. त्यामुळे पूर्व हवेलीत सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत होते. अनेकवेळा तर तासभरही कोंडी सुटत नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होते.
लोणी काळभोर व हडपसर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
लग्न समारंभासाठी आलेले स्थानिक नागरिक, पुढारी अथवा त्यांचे नातेवाईक सेवा रस्त्यावर गाडी लावतात. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो. याकडे लोणी काळभोर व हडपसर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
… तर कडक कारवाई करणार!
लग्न समारंभामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन दरम्यानच्या गावांमधील कार्यालय मालकांना बोलविणार आहे. सर्वप्रथम वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन माणसे नेमावीत, अशा सूचना देणार आहे. मात्र, महामार्गावर अथवा सेवा रस्त्यावर गाड्या लावल्या तर कडक कारवाई करणार आहे. कारवाई येथून पुढे सतत चालू राहणार आहे.
– सचिन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणी काळभोर
वाहतूक पोलिसांनी लवकर तोडगा काढावा
पुण्यात नोकरी करत असल्याने दररोज पुणे-सोलापूर महामार्गावरून जावे लागते. कामावर जाताना व येताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन दिवस उशिरा ऑफिसमध्ये पोहचते. परिणामी, कामाचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी यातून लवकर तोडगा काढावा, अशी माझी विनंती आहे.
– दीपाली साळवे, लोणी काळभोर (ता. हवेली)