पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक शासकीय विश्रामगृह पुणे येथे आज पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जलसंपदा व इतर संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळवीत, अशी मागणी आमदार राहुल कुल केली. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच जुना मुठा उजवा कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी निधी मंजुर करण्यात आला असून त्याचे काम तातडीने सुरु करावे, खडकवासला ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी भूमिगत बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने विविध मागण्या केल्या तसेच शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी देखील कुल यांनी यावेळी केली.
सध्या खडकवासला १६ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्याचे योग्य नियोजन करीत शहर व ग्रामीण भागाचा समन्वय साधत कालव्यातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन ४ मार्च तर दुसरे आवर्तन ५ मे अशी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.