लोणी काळभोर (पुणे) : विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोली परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई २२ जानेवारीला वाघोली परिसरातील भैरवनाथ तलावाजवळ करण्यात आली. राजन गोपाल नायर (वय ३३, रा. न्यू कोपरे रोड, प्राथमिक शाळेजवळ, उत्तमनगर ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक चारचाकी, चार मोबाईल, एक कॅमेरा असा ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारीला गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, भैरवनाथ तलावाजवळ मोकळे मैदानात एक ग्रे रंगाची इर्टिगा गाडी संशयास्पदरित्या उभी आहे.
सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन, त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी गाडीची पाहणी केली. यावेळी गाडीत असलेल्या व्यक्तीस त्याचे नाव, पत्ता विचारले तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने राजन पवार हे नाव असल्याचे सांगितले. दरम्यान, चारचाकी गाडीची झडती घेतली असता गाडीत विविध कंपनीचे ४ मोबाईल हँडसेट आणि एक पॅनासोनिक कंपनीचा कॅमेरा आढळून आला.
याबाबत अधिक विचारणा केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोबाईल आणि कॅमेरा चोरी केल्याचे सांगितले. त्याच्यावर कोथरुड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, कोंढवा, फरासखाना, डेक्कन, कोरेगाव पार्क, लोणीकंद आदी पोलीस ठाण्यात २१ जबरी चोरी, दरोडा इत्यादी गुन्हे दाखल आहेत. तसेच नायर याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.