शिक्रापूर : शिरुर हवेलीत वाबळेवाडीकर हे शाळेच्या यशाची गाथा तसेच अन्यायाची व्यथा सर्वांपुढे मांडत गावोगाव घरोघर फिरत आहेत. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक उन्नतीसाठी अडथळा आणल्या बद्दलचा आरोप करीत आमदार अशोक पवार यांच्याबाबत करण्यात येणाऱ्या आवाहनाला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत. त्यादरम्यान, वाबळेवाडीकर बोलताना म्हणाले की, बापूच हे चुकलंच. तसेच शाळेत राजकारण नको व्हायला पाहिजे.
यावेळी ग्रामस्थ सतीश धुमाळ बोलताना म्हणाले, आम्ही आमची वाबळेवाडीची शाळा लोकसहभागातून आंतरराष्ट्रीय दर्जाची केली आहे. संपूर्ण देशामध्ये वारे गुरुर्जीच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा गुणवत्तेमध्ये अव्वल दर्जाची ठरली आहे; परंतु तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी त्यांची खासगी शाळा बंद पडल्यामुळे या शाळेवर चुकीची कारवाई केली आहे. ही कारवाई करताना आम्ही त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता; परंतु आमच्या विरोधात षडयंत्र रचले गेले.
याप्रकरणाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. त्यावेळी त्या विषयाचा निकाल आमच्या बाजूने लागला होता. तसेच आम्हाला क्लीनचिट मिळाली. तरी देखील या आमदारांना राहवले नाही, म्हणून त्यांनी सभागृहात पुन्हा वाबळेवाडी शाळेबाबत चुकीचे वक्तव्य केले. म्हणून वाबळेवाडी ग्रामस्थांनी शिक्रापूर येथे ग्रामसभा घेऊन त्यांना गावबंदी केल्याचा ठराव मांडला. आमच्या शाळेमधील मुलांचे झालेले नुकसान हे पाहून या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व आम्हा सर्वांनी निर्णय घेतला आहे की, आम्ही 100 गाड्या घेऊन 500 लोक बाहेर पडणार आहोत. तसेच अशोक पवार यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत. तसेच यामध्ये पालक डबे आणणार आहे. प्रवासाचा डीझेल खर्चदेखील पालक करणार आहेत. आमच्या महिला भगिनीही सहभागी आहेत.
लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला प्रचाराचा अधिकार आहे. कोणाचा प्रचार करायचा तो ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. कडेलवाडी, वाबळेवाडी शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक मी यापूर्वीही विधानसभेमध्ये केले आहे; परंतु सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत असताना येथे देणग्यांच्या नावाखाली काही ग्रामस्थांनी जो गोरखधंदा चालवला होता, त्यासंदर्भात तक्रारीही आल्या होत्या. याच्या चौकशीची मी जिल्हा परिषदेकडे मागणी केली. यामध्ये संबंधित लोक दोषी आढळले आहेत.
-अशोक पवार, आमदार, शिरूर – हवेली