लोणी काळभोर : वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने आळंदी म्हतोबाच्या (ता. हवेली) गावाला मोठा तडाखा बसला आहे. या मुसळधार पावसात विद्युत रोहित्र व पूल कोसळल्याने गावाचा मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा तुटलेला आहे. आणि विद्युत पुरवठा अजूनही दोन दिवस सुरु होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आळंदी म्हतोबाच्या गावाला सलग ५ दिवस अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर महावितरणाच्या या भोंगळ कारभाराला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
अवकाळी पावसाने मागील पाच दिवसापासून पूर्व हवेलीत धुमाकूळ घातला आहे. या असमानी संकटाच्या दरम्यान, लोणी काळभोर व आळंदी म्हातोबाची येथे वीज पडली आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र काही ठिकाणी घरे, पत्र्याचे शेड, झाडे उन्मळून पडलेली आहेत. तर आळंदी व रामदरा परिसरात विद्युत रोहित्र व पोल पडले आहेत. यामुळे आळंदी म्हतोबाच्या गावाचा विद्युत पुरवठा सोमवार (ता. २०) पासून खंडित झाला आहे. तर शुक्रवारी (ता.२४) सुरु होण्याची शक्यता आहे.
आळंदी म्हतोबाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळ पासूनच वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सतत भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर दुरुस्तीच्या संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
दरम्यान, कडक उन्हाळ्यात दिवसांतील २४ तासांपैकी जास्त तास वीजपुरवठा करण्याऐवजी जास्त वीजपुरवठा बंद ठेवण्यावरच कंपनी सध्या जोर देत आहे. लोकसभा निवडणुक झाल्यानंतरही कुठल्याही पक्षाचा, कुठलाही स्थानिक नेता या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने नागरिक वीज वितरण कंपनी बरोबरच नेत्यांवरही चिडून आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य वीज बंद कंपनी करावे. असे आळंदी म्हतोबाच्या गावामधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना महावितरणाच्या उरुळी कांचन कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण महामुळकर म्हणाले की, वादळी वारा व अवकाळी पावसामुळे आळंदी म्हतोबा गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचे रोहित्र व खांब पडले आहेत. त्यामुळे गावाचा मागील तीन दिवसापासून विद्युत पुरवठा तुटलेला आहे. मात्र विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. आणि अजून दोन दिवस काम करावे लागणार आहे.