पुणे : पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाहीयेय, याचीच प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील 32 गावांमध्ये ‘गाव विकणे आहे’ अशा मजकुराचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या बॅनरमुळे 32 गावांची जोरदार चर्चा सुरु आहे. या गावातील ग्रामस्थांनी गाव विकण्यास काढले आहे. गावकऱ्यांनी गाव विकण्यास काढण्यामागचे कारण पुणे महानगरपालिका आहे. महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने ग्रामस्थांनी गाव विकण्यास काढले आहे.
पुणे जिल्ह्यातील 32 गावांनी लावलेल्या बॅनरमध्ये म्हटलं आहे की, पुणे महापालिकेचा जुलमी कर आम्ही भरु शकत नाही. त्यामुळे महापालिकेनं आम्हाला विकत घ्यावं अशीही मागणी गावक-यांनी केली आहे. यावेळी गावक-यांनी संताप व्यक्त करत आम्ही कर का भरायचा असा प्रश्न विचारला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पुण्यातील धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावांमध्ये सर्वच ठिकाणी गाव विकण्याबाबतचे बोर्ड लावण्यात आल्याचे दिसत आहे. पुणे महानगर पालिकेत समाविष्ट असणाऱ्या ‘32 गाव कृती समिती’ चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही पालिकेचा जुलमी कर भरु शकत नाही, त्यामुळे महापालिकेने आम्हाला विकत घ्यावे अशी मागणी गावक-यांनी केली आहे.