उरुळी कांचन (पुणे) : येथील विकास शिवराम जगताप यांची भाजप व्यापार आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संदर्भात महाराष्ट्र भाजपच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून ही घोषणा करण्यात आली.
विकास जगताप यांनी व्यापार व व्यापारांविषयी सातत्य ठेवून केलेल्या कामांची पावती म्हणून व्यापारी आघाडीतच त्यांना वरिष्ठ पातळीचे पद देण्याचा विचार भाजपच्या राज्यस्तरीय कमिटीने केला. व्यापार आघाडी भाजप महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक विरेंद्र कुकरेजा आणि प्रभारी विनोद कांकाणी यांनी विकास जगताप यांची व्यापार आघाडी भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नवनियुक्तीची घोषणा केली आहे.
व्यापार आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी २०१४ निवड करण्यात आली होती. व्यापारांची स्थानिक प्रश्न, केंद्र सरकारचे व्यापाराविषयी धोरण, विविध प्रश्नांवर व्यापाऱ्यांची भूमिका, व्यापाऱ्यांच्या विविध समस्या यांवर त्यांनी सातत्याने काम केले. एलबीटी, जीएसटी, लघुउद्योजक विकास, उद्योजकांबाबत केंद्र सरकारच्या योजना, उद्योग नगरीमध्ये अग्निशामक दलाचे स्थापत्य, बँकिंग व पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या बाबतच्या अडचणी, व्यापाऱ्याच्या वीज विषयक अडचणी असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्याचा व मांडण्याचा प्रयत्न केला.
कामाची दखल घेत पक्षाकडून दुसऱ्यांदा संधी
छोटे व्यापारी व मोठे व्यापारी यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अग्रेसर भूमिका घेतली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भाजपने त्यांना पुन्हा एकदा २०१७ मध्ये पुणे जिल्हा भाजप व्यापार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप सरकार असताना शासकीय पातळीवरून व्यापाऱ्यांना मदत करणे हे त्यांनी अतिशय प्रभावीपणे राबविले. विकास जगताप यांचे पक्ष व व्यापाऱ्यांविषयी त्याग, समर्पण व सातत्य यांमुळे पक्ष संघटनेत त्यांना बढती देऊन २०२० मध्ये भाजप पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली.
योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे धोरण, त्या विषयक अडीअडचणी, फुटपाथधारक, टपरीधारक तसेच पीएम विश्वकर्मा योजनेमधून बाराबलुतेदारांसाठी त्यातील योजनांचा नव उद्योजकांना लाभ मिळविण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. बँकिंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच व्यापाऱ्यांना व उद्योजकांना बँकांच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून बँकिंग धोरणाची खरी परिस्थिती समोर आणली. कोरोनाच्या काळातील बंदमुळे व्यापाऱ्यांचा मिळकत कर कमी करण्यासाठी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे सहकारी बँकेमधून व्यापाऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळण्यासाठी मागणी केली.
व्यापाऱ्यांच्या अर्थकारणासाठी पोषक वातावरण तयार करणार
राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विकास जगताप म्हणाले, “व्यापार हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. एखाद्या भागाचा विकास होणे म्हणजेच तिथे रोजगार निर्मिती, दळणवळण व व्यापार वाढणे होय. व्यापाऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधांसह, वित्त व्यवस्थापनाची व्यापाराभिमुख मागणी करत शासन, प्रशासन व व्यापारी यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. राज्यात व्यापाऱ्यांच्या अर्थकारणासाठी पोषक वातावरण तयार करुन त्यामार्फत नवीन रोजगार निर्मितीसाठी व स्थानिक व्यापाऱ्यांना बळ देण्यासाठी काम करण्याचा तसेच पक्षासाठी भक्कम संघटनात्मक कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचा मानस आहे”.