पुणे : महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांच्याविरोधात थेटपणे भूमिका घेणारे विजय शिवतारे यांचं बंड थंड झालं आहे. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवतारे यांची पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता. मात्र, विजय शिवतारे यांचं बंड अखेर शमल्याचं दिसत आहे. शिवतारे यांनी आता बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे.
विजय शिवतारे यांनी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्याने आता बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली होती. तसेच वेळ पडली तर नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करु, मात्र, अजित पवारांचा प्रचार करणार नसल्याच विजय शिवतारे म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्याची माहिती असून ते आता बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याच स्पष्ट झालं आहे.