–राहुलकुमार अवचट
यवत : राज्यात विधानसभेसाठी बुधवारी (दि.20) मतदान होत आहे. त्यासाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. विधानसभा निवडणुकांच्या सांगता सभासाठी सोमवारी अंतिम दिवस असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच अंतिम सभेसाठी उमेदवारांची मोठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या वरिष्ठ नेत्यांना सांगता सभा मिळावी म्हणून अनेक उमेदवारांनी गळ घातल्याचे दिसून आले.
यातच एक मजेशीर किस्सा दौंड विधानसभेत घडला आहे. रविवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सांगता सभा वरवंड या ठिकाणी घेतली. त्याच मैदानावर सोमवारी सकाळी महायुतीचे उमेदवार असलेले राहुल कुल यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगता सभा घेतली. यावेळी राहुल कुल यांच्या कडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
राहुल कुल यांच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्या कमी पडल्याने त्याच ठिकाणी असलेल्या शरद पवार यांच्या सभेसाठी आणलेल्या अतिरिक्त खुर्च्या कार्यकर्त्यांनी वापरल्या. त्यामुळे शरद पवारांच्या सभेतील खुर्च्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कामाला आल्याची जोरदार चर्चा संपूर्ण दिवसभर दौंड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली.
राहुल कुल यांनी सांगता सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत जंगी सभा वरवंडच्या मैदानावर घेतली. या सभेला लोटलेली गर्दी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. अनपेक्षित रित्या जमलेली ही गर्दी राहुल कुल यांना मोठ्या विजयाकडे घेऊन जाईल की शरद पवार यांची सांगता सभा रमेश थोरात यांना मताधिक्य वळवून देईल, अशी शक्यता राजकीय जाणकार आता व्यक्त करू लागले आहेत.