उरुळी कांचन (पुणे) : येथील बाजारतळ परिसरातील महादेव मंदिराशेजारी कल्याण मटका लिहून घेणाऱ्या दोघांवर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी (ता. २७) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय पांडुरंग पवार (वय ३५, रा. आश्रम रोड, उरूळी कांचन ता. हवेली) व महेश राजकुमार देसर्डा (वय ३४, रा. खोकलाई चौक, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ११ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रवीण नारायण चौधर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराशेजारी दोघेजण कल्याण मटका घेत असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, संजय पवार व महेश देसर्डा हे दोघेजण आढळून आले.
संजय पवार व महेश देसर्डा या दोघांची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पेन व कागदी चिठ्ठयांचे अंकमोड केलेले रजिस्टर व कार्बन पेपर, प्रत्येक चिठ्ठीवर ‘कल्याण’ असे लिहिलेले रजिस्टर व चलनी नोटा असा एकूण ११ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. लोकांकडून पैसे घेऊन संजय पवार व महेश देसर्डा हे दोघेजण बेकायदा ‘मटका’ नावाचा जुगार चालवत असल्याची फिर्याद चौधर यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार शेलार करीत आहेत. दरम्यान, यातील आरोपी महेश देसर्डा याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीचशे रुपयांची दारू जप्त…
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड परिसरात अडीचशे रुपयांची गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना प्लास्टिक कॅनमध्ये विक्री करीत असल्याप्रकरणी तात्या शाबू कदम याला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी प्रविण नारायण चौधर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.