हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पारंपरिक खेळ व सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गोपाळआळीचे ‘श्रीकृष्ण मित्र मंडळ’ ओळखले जाते. गेल्या ४० वर्षांपासून शहरातील प्रत्येक उपक्रमात अग्रभागी असणारे श्रीकृष्ण मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळाचा विशेष नावलौकिक आहे.
उरुळी कांचन शहरात १९८३ साली कै. गुलाबराव महादेवराव कांचन यांनी या मंडळाची स्थापना केली आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळाने सुमारे ४० वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता घडवला आहे. पारंपारिक पद्धतीने मिरवणूक व विसर्जन हे आकर्षणाचा या मंडळाचा केंद्रबिंद आहे.
या मिरवणुकीत श्रीकृष्ण मित्र मंडळाचे कार्यकत्यांनी विविध जीवंत देखाव्यांची, पारंपारिक व ऐतिहासिक, धार्मिक देखावे सादर केले आहेत. याचबरोबर मिरवणुकीत लेझीम व अन्य पारंपरिक खेळाचे सादरीकरण केले जाते. गुलाल विरहित व डीजेमुक्त या मंडळाची मिरवणूक असते. मंडळास विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेट देऊन या विविध उपक्रमाबाबत प्रशंसा केली आहे.
मंडळाचे आधारस्तंभ संतोष आबासाहेब कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष अभिषेक कांचन, उपाध्यक्ष प्रतिक धुमाळ, प्रतिक जाधव यांच्या नियोजनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अनेक सामाजिक कार्यक्रमात मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. परिसरात राहणाऱ्या लोकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. त्यांचा विश्वास, प्रेम, आपुलकी आणि सहकाऱ्यांच्या बळावर मागील ४० वर्षापेक्षा जास्त काळ मंडळ येथे कार्यरत राहिले त्यातून समता, बंधुता वाढीस लागले आहे.
मंडळाचा गणेशोत्सव मुख्य सण..
वर्षभरात दहीहंडी, महिला मेळावा, स्नेहसंमेलन, दीपावली उत्सव, रंगपंचमी, होळी, नवरात्रोत्सवात टिपऱ्या, शिवजयंती, कोजागरी पौर्णिमा आदी पारंपारिक सण मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. तसेच सामाजिक उपक्रम हाती घेतला जातो. वृक्षारोपणासह येणाऱ्या प्रत्येक पालखी, मिरवणुकांचे स्वागत करून त्यांच्या न्यारीची व्यवस्था केली जाते. कोरोना परिस्थितीतही मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने लोकांच्या मदतीला धावत होते. त्यावेळी मोठी मदतही करण्यात आली.