हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : घरगुती गॅसचे वाढलेले दर, कमी झालेली सिलेंडरची संख्या आणि लाकडाच्या धुरापासून होणारे प्रदूषण अशा स्थितीमध्ये पर्यावरणपूरक असलेला बायोगॅस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. बायोगॅसचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिरूर तालुक्यातील बाभुळसर (बु) येथील बारामती इको सिस्टीम्स या बायोगॅस संयंत्र कंपनीचे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे यांनी हे संयत्र बनविले आहे. हे संयत्र शेतकऱ्यांशी निगडीत आहे.
“एकच ध्यास शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास” हा उद्देश कंपनीचा असून, या कंपनीला भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून (MNRE) अधिकृत बायो गॅस सयंत्र उत्पादक अशी परवानगी (मान्यता) मिळाली आहे. इंधनासाठी उपयुक्त पर्याय आणि शेतीसाठी कंपोष्ट खत असा दुहेरी लाभ या बायोगॅसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होत आहे. अशा प्रकारची मंजुरी मिळालेली बारामती इको सिस्टिम्स ॲन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि ही महाराष्ट्र राज्यातील प्रथम तर भारतामधील दुसरी कंपनी ठरली आहे.
महागड्या एलपीजी गॅस सिलिंडर, जळाऊ सरपण, रॉकेल या सर्वांवर पर्याय निर्माण केला आहे. या युवकाने पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करीत पर्यावरणाचा ऱ्हास होणे देखील वाचवले आहे. त्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक संयंत्राचे देश्भारासह राज्यभर कौतुक करण्यात येत आहे. २ जनावरांच्या शेणातून १०-१२ माणसांचा स्वयंपाक तयार होऊ शकतो तसेच बायोगॅस मधुन जी स्लरी बाहेर पडते त्या स्लरीमुळे ४ ते ५ एकर सेद्रिय शाश्वत शेती केली जाते. पर्यावरणपूरक अशा या संयत्राचा आपण सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच वापर करावा.
सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे घरगुती गॅस वापरणे सर्वसामान्यांसाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यातच, रॉकेलचाही अत्यल्प पुरवठा होत असल्याने इंधन उपलब्धीसाठी नेमके काय करावे असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. अशा स्थितीमध्ये पर्यावरणपूरक असलेला बायोगॅस सध्या साऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. बायोगॅससाठी गुरांचे शेण महत्वपूर्ण घटक असून शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांमुळे आवश्यक असलेले शेण उपलब्ध होत आहे.
बारामती इको सिस्टीम्स या कंपनीने शेतकरी वर्गातील दुध उत्पादकांसाठी सहजरीत्या बसविता येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बायोगॅस प्रकल्प अनुदानावर उपलब्ध करून दिला आहे. महिलांना हा बायोगॅस कसा वापरायचा त्याची काळजी कशी घ्यायची त्यातून निघणाऱ्या सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणून कसा वापर होतो. या सर्वांची माहिती कंपनीकडून देण्यात येत आहे.
स्वयंपाकासाठी बायोगॅसचा पुनर्वापर..
अभिमन्यू नागवडे या उद्यमशील युवकाने स्वयंपाकासाठी आधुनिक बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ज्यांच्याकडे २ म्हशी किंवा २ गायी आहेत अशा शेतकऱ्यासाठी हे बायोगॅस संयंत्र बनविले आहे. उपलब्ध शेणासोबत तितकेच पाणी बायोगॅसच्या टाकीत टाकल्यावर त्यापासून मिथेन गॅस तयार होतो. तयार झालेला गॅस नळीद्वारे घरातील शेगडीपर्यंत पोहचविण्यात आला आहे. या गॅसचा वापर करून कुटुंबातील १०-१२ सदस्यांसाठी रोज दोन वेळचे जेवण तयार होते. तसेच चहा, नाश्ता तयार करण्यासाठी देखील गॅस उपयोगी पडतो. एकंदरीत बायोगॅसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांचा स्वयंपाक करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
बायोगॅसची स्लरी बहुपयोगी..
बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त स्वयंपाकासाठी गॅसच उपलब्ध होत नसून बहुउपयोगी अशी स्लरी देखील उपलब्ध होत आहे. द्रव्य स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या स्लरीचा उपयोग झाडांवर फवारणीसाठी होतो. तसेच घट्ट स्लरीचा उपयोग खत म्हणून होत आहे. बायोगॅसची स्लरी झाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरल्याने एलपीजी सिलिंडरची गरज भासत नसून त्यामुळेशेतकऱ्यांची दरमहा २ हजार रुपयांची बचत होते.