उरुळी कांचन, (पुणे) : मागील काही दिवसांपासून उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. दूषित आणि पिवळसर आणि मातीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने उरुळीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Citizens suffer due to contaminated water supply in Uruli Kanchan; Citizens’ health is in danger.)
नागरिकांना घरातील भांड्यांमध्ये पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परंतु हंडा अथवा कळशीमध्ये साठविलेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर कधी पिवळसर रंग दिसून येत आहे. भांड्यांच्या तळाशी गाळ साचून राहत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दातार कॉलनी परिसरात दुषित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी ग्रामपंचायत विरोधात रोष व्यक्त केला आहे. प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत असून या बाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने उन्हाळ्यामध्ये कृत्रिम पाणीटंचाईला नागरिक सामोरे जात आहेत. आम्ही सर्व प्रकारची कर भरून देखील आम्हाला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत विहीरीवरून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पण या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने पाईपलाईन काही ठिकाणी फुटली आहे. परिणामी घाण पाण्याच्या डबक्यातील पाणी पाईपलाईन शिरत आहे. हे दुषित पाणी ग्रामस्थ दररोज वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल केले जातात..
नागरिकांना दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी पाजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यांना त्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “३५ ते ४० वर्षापूर्वीची पाईपलाईन असल्याने ती खराब झाली असल्याने पाणी खराब येत आहे. ज्या ठिकाणी गळती झाले आहे. ते सापडत नसल्याने काही घरांमध्ये पिवळसर रंगाचे पाणी येत आहे. दोन दिवसात लिकेज न सापडल्यास नवीन पाईपलाईन करण्यात येईल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :