उरुळी कांचन, (पुणे): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) (Uruli Kanchan) ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आशीर्वादाने व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले चेंबर कचऱ्याने जाम झाले आहेत. महामार्गावर पाणी साचल्यामुळे एक लेन बंद पडण्याच्या अवस्थेत असून वाहतूक कोंडी मोठी झाली आहे. रविवारी रात्री (ता. 14) पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. महामार्ग प्राधिकरणच्या मनमानी कारभारामुळे पाण्यातून वाट काढत व्यावसायिक, नागरिक, व वाहनचालकांना कसरत करावी लागली. मध्यरात्री वीज प्रवाह खंडित झाला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत पावसाच्या पाण्याचे मोठे संकट उद्भवले आहे.

शासनाच्या अधिकाऱ्यांना तो राष्ट्रीय महामार्ग आहे याचाच विसर पडला आहे, कोणतीही दुरुस्ती व नैमित्तिक देखभाल करुन रस्ता सुस्थितीत ठेवणे आपले कर्तव्य आहे हे ते विसरले आहेत. त्यामुळे महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महामार्गावर पाणी निचरा होत नसल्याने व्यावसायिकांचे, वाहनचालकांना पावसाच्या पाण्यामुळे हाल होत आहेत. रस्त्याच्या बाजूस असलेल्या व्यावसायिकांनी मुरूम भरल्यामुळे पाणी सेवा रस्त्यावर येऊन साठून तसेच राहत आहे. त्यामुळे वाहन चालक अपघात ग्रस्त होत आहेत.
शिंदवणे, वळती परिसरात झालेल्या पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरळी कांचन शहरास रात्री उशिरा शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उरुळी कांचन शहरातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण झाल्याचा फटका उरुळी कांचन शहर वाशियांनी चांगलाच अनुभवला. ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे ओढ्यातून पाणी जाण्यास पुरेशी जागा नसल्याने, ओढ्यातील पाणी शहरात शिरले. यामुळे ओढ्याकाठच्या हजारो नागरीकांना रात्र जागून काढावी लागली. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, दीपक यादव, महिला कर्मचारी पूजा तानवडे, सारिका गवारे यांनी रात्रभर ग्रामस्थांची काळजी घेतल्याने, उरुळी कांचन परीसरात कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहाणी होऊ शकली नाही. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

उरुळी कांचन शहर जलमय, ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचा मोठा फटका..! (Uruli Kanchan)
वळती व डाळींब (ता. दौंड) या दोन गावाच्या हद्दीतील डोंगरात उगम पावणारे दोन ओढे उरुळी कांचन शहरात एकत्र होऊन, दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात. डाळींब परिसरातून आलेला ओढा पांढरस्थळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाच्या खालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. तर वळतीहून निघालेला ओढा शिंदवने मार्गे जेजुरी रस्त्याजवळून व पुणे-सोलापुर महामार्गाखालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. सायरस पुनावाला शाळेजळ दोन्ही ओढे एक होऊन, रेल्वेखालील मोऱ्यातून दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात.
दरम्यान, वरील दोन्ही ओढ्यावर, ओढ्यालगतच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत. पंचवीस वर्षापूर्वी शंभर फुटाहून अधिक रुंदी असलेले ओढे, सध्या दहा फूट रुंदीचेही उरलेले नाहीत. ओढ्यालगत अनेक व्यावसायिकांनी दुकानं, टपऱ्या टाकून अतिक्रमण करुन पुर्णपणे वेढले आहे. यामुळे वळती व डाळींब भागातील घाटमाथ्यावर थोडाफार पाऊस झाला तरी, उरुळी कांचन शहरातील रस्ते व दुकाने पाण्याखाली जाणं हे समीकरण नेहमीचाच झालं आहे. रविवारी पावसाचे पाणी ओढ्यात मावत नसल्यानेच, पाणी इंदिरानगर, उरुळी कांचन शहरातील बाजारपेठ, बाजारमैदानात शिरल्याने हाहाकार उडाला होता. यामुळे ओढ्याकाठच्या हजारो नागरीकांना रात्र जागून काढावी लागली.
दरम्यान, रात्रभर पडत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उरुळी कांचन शहरात प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी दिसुन येत आहे. ओढ्यातून जाणारे पाणी रेल्वेखालील नऊ मोऱ्यात बसत नसल्याने, पाण्याचा फुगारा गावात दिसून येत आहे. परिणामी गावातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले आहेत. पुढील घडामोडींवर उरुळी कांचनचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.
उरुळी कांचन जलमय होण्याची प्रमुख कारणे..
- वळती व डाळींब (ता. दौंड) गावातुन येणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणे.
- शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांची रुंदी शंभर, सव्वाशे फुटावरुन दहा ते पंधरा फुटावर येणे.
- ओढ्यात कचरा टाकणे
- ओढ्यात बांधकामाचा राडारोडा टाकणे
- ओढ्यावर बांधलेल्या पुलांची उंची पुरेशी नसणे, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणे.
- पावसाळ्यापुर्वी ओढ्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ.
हेही वाचा: Shirur Rain: तालुक्यातील दोन रस्ते पाण्याखाली; काही तास दळणवळण ठप्प…







