न्हावरे: शिरूर तालुक्यातील निमोणे-मोटेवाडी आणि पिंपळाचीवाडी ते भोसेवाडी या गावांना जोडणारे दोन्ही रस्ते आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान मध्यम व संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे चार ते पाच तास पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या रस्त्यावरून दळणवळण बंद झाले होते. (Shirur Rain)

मात्र, आज (ता. 15)सकाळी 11 नंतर पावसाने उघडीप दिल्याने येथील वाहतूक पुन्हा सुरू झाली. परंतू, प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पाऊस सुरू झाल्यानंतर संबंधित दोन्ही रस्त्यांचा वापर नागरिकांनी टाळावा. असे आवाहन पोलिस पाटील इंदिरा जाधव यांनी केले आहे.
सुरू असलेल्या पावसामुळे शिरूरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आगामी हंगामासाठी आशा पल्लवीत झाल्या असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाच्या पिकाबरोबरच ज्वारीच्या एकूण क्षेत्रामध्येही वाढ होणार आहे. असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात करडे, आंबळे, न्हावरे, निमोणे, निर्वी, शिरसगाव, इनामगाव मांडवगण फराटा, तांदळी, वडगाव रासाई, सादलगाव, कुरुळी, आंधळगाव, रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव इत्यादी ठिकाणी सतत संततधार व मुसळधार पाऊस झाला.








