उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) हद्दीत रविवारी (ता. 14) दिवसभर व रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अष्टापूर-माळवाडी परिसरातील ओढ्यातील पाणी शेतात घुसल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. (Pune Ashtapur Rain)

देविदास निवृत्ती कोतवाल, पांडुरंग जयवंत कोतवाल, कांतीलाल सदाशिव कोतवाल, रवींद्र मारुती कोतवाल, हनुमंत राजवडे दाजी, तानाजी तुकाराम कोतवाल, सोनल दिलीप कोतवाल, रामदास पाटील बुवा कोतवाल, हनुमंत श्रीरंग कोतवाल या शेतकऱ्यांच्या पालक, बाजरी, कडवळ व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अष्टापूरमधील खोल शेत, चांगुचा मळा, सजगणी, हनुमान वाडी, फळी वस्ती या भागांतही पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सदर परिसराला यशवंत कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, श्रीहरी दादा कोतवाल, आष्टापूर गावच्या सरपंच पुष्पा कोतवाल, उपसरपंच संजय कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप व माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, या वेळी सर्कल, तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा: Daund: कोट्यवधी खर्चूनही दौंडमध्ये पाण्यासाठी वणवण, जलजीवन मिशन योजना केवळ कागदावरच?







