पुणे: पुणे शहर (Pune News)आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणातून 7,677 क्युसेक्स आणि वरसगाव धरणातून 3,576 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

नदीची पातळी वाढली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना आणि वस्त्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीत उतरू नये असे आवाहन केले आहे.

धरणांमधील सद्यस्थिती
- खडकवासला धरण: 98.4% भरले असून, सकाळी 9 वाजता विसर्ग 10,611 क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला.
- वरसगाव धरण: 100% भरले असून, 3,576 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
- पानशेत धरण: 100% भरले असून, 1720 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- टेमघर धरण: 100% भरले असले, तरी सध्या विसर्ग सुरू नाही.
मुठा नदीतील पाणी पातळी पाहता पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.







