पुणे : बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. ते आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळे यांचे अवघ्या काही महिन्यातच ससूनमध्ये पुनरागमन होताना पाहायला मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात डॉ. काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरोधात डॉ. काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल होता. दरम्यान, १४ जुलै रोजी मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द ठरवली होती. आता पुन्हा काळे यांना अधिष्ठाता करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले आहेत.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर होते. या समितीने ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्राथमिक कारवाई करून खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केले तेव्हापासून या पदावर डॉ. विनायक काळे येणार असल्याची चर्चा होती. आज अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत आदेश काढले आहेत.