शिक्रापूर : विजेचा धक्का बसल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे घडली. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आकांक्षा दीपक पवार (वय १८, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे) व आशा नवनाथ खलसे (वय ५२, रा. भैरवनाथनगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय ज्ञानेश्वर दौंडकर (वय ३०, रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे) व सोमनाथ राम गायकवाड (वय ३१, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील आकांक्षा पवार ही युवती घरामागील एका प्लॉटिंगजवळ काही कामाच्या निमित्ताने गेली होती. त्यावेळी प्लॉटिंगच्या तारेवर पडलेल्या विजेच्या तारेचा आकांक्षाला धक्का बसून तिचा मृत्यू झाला. तर, तळेगाव ढमढेरे येथील आशा खलसे या घराशेजारी काम करत असताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे व पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.