लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाळीस दुचाकी धडकल्याने अपघात झाला. हा अपघात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पिराच्या मंदिराच्या समोर झाला. या अपघातात दाजीचा जागीच मृत्यू तर मेव्हुणा गंभीर जखमी झाला आहे.
प्रशांत हनुमत हिंगणे (वय-४२, रा. हिंगणेमळा, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर विक्रम कापरे (वय-३८ , रा. विशाल पार्क, मगरपट्टा, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम कापरे यांचे प्रशांत हिंगणे हे नात्याने दाजी आहे. हे दोघे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर होते. त्यांचे काम आटोपून ते सोलापूरकडून पुण्याच्या दिशेकडे चालले होते. तेव्हा दुचाकी प्रशांत हिंगणे हे चालवीत होते. तर दुचाकीच्या पाठीमागे विक्रम कापरे हे बसले होते.
प्रशांत हिंगणे यांनी मोटार सायकल ही वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवीत होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना, प्रशांत हिंगणे यांनी मोटारसायकल अचानकपणे डावे बाजुस वळवुन, रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाळीस धडक दिली.
दरम्यान, या अपघातात प्रशांत हिंगणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात विक्रम कापरे हे जखमी झाले. याबाबतची फिर्याद कापरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करत आहे.