उरुळी कांचन, (पुणे) : दुचाकीवरून घरी निघालेल्या अष्टापूर (ता. हवेली) येथील दोघांना अज्ञात ६ ते ७ जणांच्या टोळक्याने मारहाण करून त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना उरुळी कांचन – भवरापूर रस्त्यावर घडली आहे. शुक्रवारी (१ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आदित्य देविदास कोतवाल (वय- १८) व प्रज्वल ज्ञानदेव कटके (वय – १९, रा. दोघेही, अष्टापूर, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल कटके याचे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत दुकान आहे. तर आदित्य हा एका मोबाईलच्या दुकानात मोबाईलची दुरुस्ती करण्याचे काम शिकत आहे. नेहमीप्रमाणे प्रज्वल व आदित्य हे दोघेजण दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी भवरापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एस. एस. अग्रो फूड कंपनी येथे आले असता उरुळी कांचनच्या बाजूने निघालेल्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली.
त्यानंतर दोघांनी चारचाकी गाडी थांबवून त्या चालकाला जाब विचारला. त्या चारचाकी गाडीच्या चालकाने झोप लागल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या गाडीचे काय नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देतो, असे म्हणाला. यावेळी उरुळी कांचन या ठिकाणी निघालेला एक दुचाकीचालक त्या ठिकाणी थांबला व त्याने घटनेची माहिती विचारली.
दरम्यान, त्या दुचाकी चालकाने आदित्य व प्रज्वल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने जवळच असलेले त्याचे आणखी ५ ते ६ साथीदार बोलवून चारचाकी चालक, आदित्य व प्रज्वल यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या टोळक्याने चारचाकी गाडीची काच व आरसे फोडले. तसेच दुचाकीचे नुकसान केले. उरुळी कांचन बाजूकडे निघालेल्या एका टेम्पोचीही काच या टोळक्याने फोडली. या घटनेनंतर दोघेजण पळून घरी गेले व त्यांनी घडलेली घटना घरी सांगितली.
आरोपी पोलिसांचा रोजचा कस्टमर..
तक्रारदार हे उरुळी कांचन चौकीत आले असता त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने हकीकत विचारत माहिती घेतली. वर्णनावरून परिचित असलेल्या आरोपीचा फोटो हा तक्रारदार यांना दाखवला असता त्यांनी हाच असल्याचे सांगितले. तसेच सदरचा कर्मचारी म्हणाला की, हा आमचा रोजचा कस्टमर आहे. तुम्ही तुमची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल करा. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले असता त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी परत तुम्ही तुमची तक्रार ही उरुळी कांचन या ठिकाणी दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करीत आहेत.