Pune Crime : पुणे : पुणे शहरात एटीएममधून चोऱ्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चोरटे विविध भागांत जाऊन एटीएममधून चोऱ्या करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होत होत्या. अखेर तक्रारींचे प्रमाण वाढत गेले आणि पोलीस सतर्क झाले. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्या सापळ्यात दोघे जण अडकले. दोघांना पकडून अटक करण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना उघड झाली आहे. आरोपी उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यांना अटक केल्यानंतर चौकशी सुरु केली असता, शहरात अनेक ठिकाणी या पद्धतीने चोऱ्या केल्याचे त्यानी कबूल केले. उत्तर प्रदेशातही अशा चोऱ्या चोरटे करत होते.
या चोरट्यांनी विश्रामबागपूर्वी शनिवार वाड्याजवळील एटीएममधून चोरी केली होती. दोघांकडून पुणे वाहतूक पोलिसांनी नऊ हजार पाचशे रुपयांची रक्कम जप्त केली. ही कारवाई पुणे वाहतूक पोलिसांनी केली.
कशी होती चोरी करण्याची पद्धत…
उत्तर प्रदेशमधील चोरटे एटीएममध्ये पैसे निघण्याच्या स्लॉटमध्ये एक प्लॅस्टीकची पट्टी लावत असत. ही पट्टी लावल्यानंतर एटीएममध्ये पिन टाकल्यावर पैसे मोजले जात असत. ते पैसे मशिनमधून बाहेर येत होते. परंतु या प्लास्टीकच्या पट्टीमुळे ते अडवले जात होते. ग्राहक वाट पाहून, पैसे न मिळाल्यामुळे निघून जात असत. ग्राहक निघाल्यावर हे दोघे एटीएममध्ये जाऊन ती प्लास्टीकची पट्टी काढून पैसे काढत असत. ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होते होते, परंतु त्यांना ते मिळत नव्हते.
यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी सांगितले.