पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांना वारजे पोलिसांनी अटक केली. एटीएममधील कप्यातून पैसे बाहेर पडण्याच्या जागेत चोरट्यांनी लोखंडी पट्टी अडकवून फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
संतोषीकुमार किशोरीलाल सरोज (वय ३०) व प्रदीप कुमार नंदकिशोर मौर्य (वय २८, दोघेही सध्या रा. वारजे, मूळ रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. वारजेतील एनडीए रस्त्यावर एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी बँकेकडे केल्या होत्या.
एटीएममधून व्यवहार केल्यानंतर नागरिकांना बँकेकडून संदेश आले होते. त्यानंतर बँकेने एटीएमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर दोन संशयित आढळले. त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी एटीएम सेंटरच्या परिसरात सापळा लावून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी या पद्धतीने शहरातील वेगवेगळ्या भागात फसवणुकीचे गुन्हे केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास जारी करण्यात आला आहे.
एटीएमच्या ज्या भागातून पैसे बाहेर (कॅश डिस्पेन्सर) पडतात. त्या भागात लोखंडी पट्टी ठेवली जाते. चोरटे एटीएमच्या बाहेर पाळत ठेवतात. व्यवहार केल्यानंतर पैसे पट्टीमुळे अडकतात. व्यवहार पूर्ण झाला नाही किंवा तांत्रिक अडचण आल्याची शक्यता गृहित धरुन नागरिक एटीएममधून बाहेर पडतात. एटीएमच्या बाहेर पाळत ठेवणारे चोरटे लगेच आत शिरतात व पट्टी सरकवून अडकलेले पैसे घेऊन पसार होतात. सरोज आणि मौर्य यांनी अशा पद्धतीने ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.