पाबळ, (शिरूर) : शिरूर तालुक्यातील पाबळ या गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्यन संतोष नवले (वय-१३) आणि आयुष संतोष नवले (वय-१०, दोघेही रा. राहू, ता. दौंड) अशी मृत भावंडांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २२) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मुलांचे मामा सचिन बाळासाहेब जाधव (वय-३५) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने पाबळ व राहू परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाबळ येथील सचिन जाधव यांची बहीण अश्विनी संतोष नवले ही मुलांना सुट्टी लागल्याने आर्यन व आयुष या दोघांना घेऊन माहेरी आली होती. मुलांचे आजोबा शेळ्या चारण्यासाठी शेतात चालले असताना आर्यन व आयुष हे दोघेही त्यांच्यासोबत शेतात गेले. दुपारच्या सुमारास आजोबांची नजर चुकवून ते शेताच्या जवळच असलेल्या भाऊसाहेब जाधव यांच्या शेततळ्यावर पोहण्यासाठी गेले.
प्रचंड ऊन असल्याने दोघांनी कपडे काढून पाण्यामध्ये उड्या मारल्या. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी आजोबांनी आरडाओरडा केल्याने कैलास जाधव हे मदतीसाठी धावून आले. त्यांनी शेततळ्यात उडी मारून दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पाबळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केली. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.