पुणे : मोपेड गाडी विक्री करायला आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना येरवडा पोलिसांनी बुधवारी (ता. 2) रोजी अटक केली आहे. 2 गुन्ह्यांची उकल करून आरोपींकडून 2 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
यश सागर ओंबाळे (वय 23, रा. दुर्गामाता मंदिराच्या जवळ, कंजारभाट, येरवडा पुणे) व ओमकार राजेश मोरे (वय 21, रा. स. नं. 14, रामनगर, येरवडा पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने पोलीस येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. 2) गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना दोन संशयीत इसम दोन मोपेड गाडी विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. दोन्ही चोरट्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच, त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, आरोपी यश ओंबाळे व ओमकार मोरे याच्याकडून पोलिसांनी दोन मोपेड गाडी व 6 मोबाईल असा 2 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी चतुश्रृंगी व शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हे केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांना आरोपींचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे.
सदरची कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप व विजय अडकमोल यांच्या पथकाने केली आहे.