पुणे : राज्यात सातत्याने महिला अत्याचारच्या घटनां वाढत चाललेल्या आहेत. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. विरोधकांकडून राज्य महिला आयोग बरखास्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘तुतारीचे पदाधिकारी हे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर असून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घ्यावी’, असा खोचक सल्ला चाकणकर यांनी दिला आहे.
चाकणकर म्हणाल्या, मागील तीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत असल्याने राज्यात कुठेही महिला अत्याचाराबाबत घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाची आठवण येते. कारण राज्य महिला आयोग आपल्याला न्याय मिळवून देईल असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझ्या कामाचं यश आहे. तर, महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर आम्ही त्याची दखल घेतो. मात्र काही प्रकरणांमध्ये पोलिस कारवाई करत असतील, तपास करत असतील तर महिला आयोग त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, एखाद्या प्रकरणांमध्ये महिलेला न्याय मिळण्यास दिरंगाई होत असेल अथवा तिला न्याय मिळत नसल्यास मात्र महिला आयोग त्याची तातडीने दखल घेतो. असही चाकणकर म्हणाल्या.
चाकणकर पुढे म्हणाल्या की, विरोधक टीका करत आहेत. कारण, महाराष्ट्रातील जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून घरी बसण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय सद्या दुसरं कोणतंही काम नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर विद्या चव्हाण या त्याबाबत बोलतात हे हास्यास्पद आहे. कारण त्यांनी त्यांच्या सुनेचा किती छळ केला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे.
शरद पवारांच्या पक्षांमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेली महिला जर सुनेचा छळ करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही नाही, असं म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावरही टीका केली. तसेच कुरारमध्ये घडलेल्या घटनेमधील पीडित महिला आणि त्यांच्या दोन मुलींचा विनयभंग करणारा वार्ड अध्यक्ष हा तुतारी गटाचा असून महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या ज्या घटना होत आहेत. त्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी आघाडीवर आहेत.असे रुपाली चाकणार म्हणाल्या.