Tribute To N D Mahanor : पावसाच्या सुखद शिडकाव्याची चाहूल देणारी पावश्याची साद, पक्षांचा किलबिलाट अन् हिरवाईने नटलेल्या सृष्टीला सूर्याच्या सोनेरी किरणांचा साज… अशा मनोहारी वातावरणाचा आस्वाद घेत असतानाच अचानक एक दुखःद बातमी समोर आली. या अद्वितीय निसर्गाची ओळख ज्याने करून दिली ते निसर्गकवी ना. धो. महानोर आपल्यातून निघून गेले. हे वृत्त समजताच मनात कालवाकालव झाली. मनात नकळत असंख्य आठवणी दाटून आल्या अन् डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
सध्या अधिक महिना सुरू आहे. लवकरच श्रावणाला सुरूवात होणार आहे. निसर्गाने रूपडं पालटलं आहे. कुठे धो धो बरसणारा पाऊस, तर कुठे हलक्या सरींनी धरणाईला नटवले आहे. सकाळीच पडणारे दवबिंदू अन् हळूवार सुखावणारी सर, आकाशात बदललेल्या रंगांची उधळण… जणू या निसर्गकवीला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे की काय, असाच आभास होत होता.
निसर्गातील मातीला देखील सुंगध देणारा परिपूर्ण कवी
मला आठवतं २०११ मध्ये बारामती येथे १८ वी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद भरली होती. बारामती येथील धो. आ. सातव ऊर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने ही परिषद भरली होती. अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॅा. आ. ह. साळुंखे तर संमेलनाचे उद्घाटन ना. धो. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. (Tribute To N D Mahanor) कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे आणि साहित्यिक दशरथ यादव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
पावसाळ्याचे दिवस होते… लांबचा प्रवास आणि वाहनांच्या गर्दीमुळे मला संमेलनस्थळी पोहोचायला उशीर झाला होता. पण प्रथमच निसर्ग कवी ना. धो महानोर सरांना भेटण्याची संधी मिळणार म्हणून मी आतूर झालो होतो. त्यांची चित्रपट गिते आणि कविता या कोणालाही सहज भुरळ घालणाऱ्या होत्या. या संमेलनात त्यांनी सादर केलेल्या कविता मनाला भिडल्या. पायजमा-शर्ट असा साधा पेहराव, उंचापुरा बांधा, डोळ्याला चष्मा… पण वागण्या-बोलण्यात तेवढाच साधेपणा…
निसर्गातील मातीला देखील सुंगध देणारा परिपूर्ण कवी मी त्यादिवशी याची देही याची डोळा पाहिला… एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या या कवीने खऱ्या अर्थाने निसर्ग पाहिला होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला असणारी सुंदरता प्रत्येकाच्या काळजाला घर करणारी होती. (Tribute To N D Mahanor) जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजतो… या त्यांच्या गिताने मी त्यावेळी भारावलो होतो. निसर्गवेड्या कवीला मी प्रथमच पाहिले होते.
नवोदित कवी म्हणून मला देखील या संमेलनात नाधोंच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह देऊन त्यांनी पाठीवर थाप मारली. त्यावेळी आपण देखील या निसर्गाचा भाग असल्याचा भास झाला. निसर्गकवीचे वाकून दर्शन घेतले. (Tribute To N D Mahanor)
एवढ्या गर्दीत मला पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. मात्र, मनात घर करून जाणाऱ्या हसऱ्या व दिलखुलास निसर्गातील रूप शब्दांत व्यक्त करणाऱ्या निसर्गकवीशी मी जोडला गेलो होतो. श्रावणाच्या उंबरट्यावर त्यांचे जाणे, कविता, गितांच्या माध्यमांतून सगळ्यांच्या मनात निसर्गाचा गंध दरवळत ठेवेल हे मात्र नक्की…
जेष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांना पुणे प्राईम न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…