Pune Prime News : दिवाळी अर्थात दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव! वर्षातील सर्वात मोठा सण म्हणूनही दिवाळी सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या सणाची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापासून होते. दिवाळसणात मुख्य आकर्षण असते ते दिवाळी पाडव्याचे. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असे या दिवसाचे वर्णन करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. यावर्षी १४ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा साजरा होत आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. दिवाळी पाडवा सणाचे महत्त्व आपण जाणून घेऊया…
दिवाळी पाडव्याचे महत्त्व काय?
बली प्रतिपदा, ज्याला बली पद्यामी, पाडवा, विराप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा असेही म्हणतात. हा दिवाळीचा चौथा दिवस आहे, जो हिंदूंचा दिव्यांचा सण आहे. दैत्यराजा बालीच्या पृथ्वीवर परत आल्याच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. बाली पद्यामी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या ग्रेगोरियन कॅलेंडर महिन्यात येते. या शुभदिनी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यासोबतच, नवीन वाहनाची देखील खरेदी केली जाते. तसेच अनेक व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमाखर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यापारी वर्ष सुरु करतात. ज्याला विक्रमसंवत्सर असे म्हटल जाते.
दिवाळी पाडवा कसा साजरा करतात?
पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी संपते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा असतो. या दिवशी घर तसेच कामाच्या ठिकाणी दारापुढे सुबक रांगोळी काढली जाते. तेलाच्या दिव्यांनी परिसर सजविला जातो. आकर्षक रोषणाई केली जाते. नवे कपडे परिधान केले जातात.
या दिवशी सकाळी पुरुषांना विशेषतः पत्नी आपल्या पतीला उटणे, तेल लावून स्नान घालते. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना तसेच नवऱ्याला पाटावर बसवून, पाटाभोवती रांगोळी काढून त्यांचे औक्षण केले जाते. आपले वैवाहिक जीवन उज्ज्वल व्हावे आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहावा यासाठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो.
नवविवाहित जोडप्यांचा विशेष मान
नवविवाहित जोडप्यांसाठी दिवाळीचा पहिला पाडवा खूप खास असतो. या दिवशी नव विवाहित जोडप्यांकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण करतात आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देण्यात येतो. नवरदेवाला सासरच्या मंडळींकडून खास आमंत्रित करण्यात येते, त्यांच्यासाठी खास स्वादिष्ट जेवण केले जाते.
बलिप्रतिपदा पूजा
दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला ही खास महत्व आहे. बलिप्रतिपदेतील बळी राजाची आजच्या दिवशी खास पूजा केली जाते. हा बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता. विष्णूच्या वामन अवताराने या बळी राजाकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते. परंतु, हा बळी राजा उदार होता. तो जनतेची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे, आजच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आजही भावाला ओवाळताना महिला आवर्जून म्हणतात की, ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’.
दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त
- १४ नोव्हेंबर – सकाळी ६ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.
- तिथी – शु. प्रतिपदा १४.३६
- नक्षत्र – अनुराधा २७.२३
- योग – शोभन १३.५५
- करण – बालव २६.१५