पुणे : शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस येत्या 29 जुलै रोजी 100 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. ही घटना जगातील व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण ‘शिदं’च्या रुपाने भारतातील एकमेव सक्रिय व्यंगचित्रकार शतकी वाटचालीत प्रवेश करीत आहे.
हा योग साधून वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. 100’ या भव्य ४ दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन 29 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. तसेच या मोह्त्सवाची पुण्यातून सुरूवात करून महाराष्ट्रातील व भारतातील महत्वाच्या शहरांमधून प्रवास करत या महोत्सवाचा समारोप २९ जुलै २०२५ रोजी मुंबई मध्ये होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली आहे.
या महोत्सवात 29 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता ‘शिदं’चा ह्रद्य नागरी सत्कार सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे. यावेळी ‘शिदं’चा सन्मान पुणेरी पगडी, उपरणे आणि मानपत्र देऊन करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान बालगंधर्व कलादालनात ‘हसरी गॅलरी’ हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यामध्ये ‘शिदं’ची गाजलेली व्यंगचित्रे पाहायला मिळणार आहेत.
तसेच महाराष्ट्रातील नामांकित व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या शब्दविरहित व्यंगचित्रांचे खास दालन यामध्ये असणार आहे. ‘हसरी गॅलरी’ मध्ये महोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत व्यंगचित्रविषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार असून यामध्ये व्याख्यान, परिसंवाद, मान्यवरांशी गप्पा, ‘मास्टर क्लास’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभरात ‘शिदं’वर विशेष लघुपट तयार करण्यात येणार असून त्याची निर्मिती मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत करण्यात येणार आहे. हा महोत्सव पुण्यासह मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, इंदूर, बडोदा, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, पणजी, फोंडा, मडगांव, जळगाव, सांगली, मिरज, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड, बेळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर अशा विविध भागात घेण्याचा मानस असल्याचेही संयोजकांनी यावेळी सांगितले आहे.