लोणी काळभोर, (पुणे) : पुणे -सोलापूर महामार्गावर पहाटेच्या काळोखात सेवा रस्त्यावरील वाकलेली लोखंडी जाळी न दिसल्याने दुचाकीवरील पती-पत्नी व चार वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून पत्नीलाही दुखापत झाली आहे. रविवारी (ता. 03) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मोसिन युसुफ चाऊस (वय- 40, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात त्यांची पत्नी सुल्ताना मोसिन चाऊस (वय – 35,) या जखमी झाल्या आहेत. तर चार वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. मात्र, तिचे नाव समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात राहणारे राजेंद्र काळभोर हे नेहमीप्रमाणे सकाळी घरातून फिरण्यासाठी निघाले होते. घरापासून १०० मीटर पुण्याकडे जात असताना एक दुचाकी व त्यावरील एक पुरुष व महिला तसेच त्यांच्या बाजूला एक मुलगी खाली पडल्याचे दिसून आले.
राजेंद्र काळभोर यांनी सदर ठिकाणी जाऊन सदर महिला, मुलगी व दुचाकीवरील व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी चालक मोसिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उठता येत नव्हते. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. काळभोर यांनी तात्काळ शिवम रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलवली व त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. सध्या मोसिन चाऊस यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एनएचएआयचे रस्त्याकडे दुर्लक्ष
दरम्यान, पुणे- सोलापुर महामार्गवरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड ) या दरम्यानचा रस्ता आयआरबी या खाजगी कंपनीने विकसीत केला होता. मात्र, मुदत संपल्याने आयआरबी कंपनीने वरील रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला आहे. मात्र, रस्त्याची अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्यावेळेस लुटूपुटू अशी डागडुजी करण्यात येते. कवडीपाट टोलनाका मुदत संपल्याने बंद करण्यात आला आहे. आता हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असूनही त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
लोखंडी जाळ्या मोडलेल्या अवस्थेत.!
सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले लावले आहेत. मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत असल्याने असे प्रकार वाढत आहेत.
महामार्गावर अनेक अडथळे…!
रस्त्यालगत वाढलेली हॉटेल, ढाब्यांची संख्या, त्यावर राजरोसपणे होणारी अवैध दारूविक्री, काही हॉटेल व्यावसायिकांच्या भल्याचा विचार करून हॉटेलसमोर रस्त्यावर घातलेले गतिरोधक, लोकांनी सोईसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, व्यावसायिकांनी मुख्य रस्ता व सेवा रस्त्याला जोडण्यासाठी बेकायदा मुरूम टाकून तयार केलेला जोड रस्ता व सेवा रस्त्यावर वाढलेले नागरिकांचे अतिक्रमण यासारख्या अनेक गोष्टी वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत.